“शिरूर’, “मावळ’साठी निवडणुकीचा आजपासून आखाडा

अधिसूचना जारी होणार : मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

पिंपरी –
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीचा आखाडा रंगण्यास प्रारंभ होणार आहे. 2 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येणार असून राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असले तरी आणखी किती पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आठवडाभरात स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. दोन्ही मतदारसंघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा दुहेरी सामना रंगणार असला तरी इतरही प्रादेशिक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच या मतदारसंघात लढत झाली आहे. आता तिसऱ्यांदा हे दोन्ही पक्ष आमनेसामने येत आहे. शिरूर आणि मावळसाठी उद्या मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल आणि त्यानंतर लगेचच अर्ज भरण्यास प्रारंभ केला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी बारामती आणि पुणे या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर त्या पाठोपाठ आता मावळ आणि शिरूरची सुरुवात होणार आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात वजनदान नेते म्हणून कार्यरत असल्याने पुणे जिल्ह्यातील या चारही मतदारसंघाकडे राज्यासह देशभरातील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. मावळ आणि शिरुरसाठी 2 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधी अर्ज भरता येणार असून 10 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 11 व 12 एप्रिल हा कालावधी राहणार असून अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ उमेदवारांना देण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजी सायंकाळी दोन्ही मतदारसंघातील लढतींचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार असले तरी प्रमुख लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच उमेदवारांमध्ये होण्याची शक्‍यता आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये 7 व्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. तर शिरुरसाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सातव्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जांच्या विक्रीला सुरवात होणार असून लगेच उमेदवारी अर्जही सादर करता येणार आहेत.

…असा आहे निवडणूक कार्यक्रम

– 2 ते 9 एप्रिल- उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी
– 10 एप्रिल- उमेदवारी अर्जांची छाननी
– 11 ते 12 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
– 29 एप्रिल – मतदान
– 23 मे – मतमोजणी आणि निकाल

अर्ज भरण्यास दोन दिवसांची सुट्टी

इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 दिवसांचाच अवधी मिळणार आहे. दि. 6 एप्रिल रोजी गुढीपाडवा असल्याने शासकीय कार्यालयाला सुट्टी आहे. तर 7 एप्रिल रोजी रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी असणार आहे. या दोन दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच कालावधी मिळणार आहे.

मतदारांना टोल फ्री क्रमांकावर मिळणार माहिती

निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमदेवार तसेच त्यांच्या राजकीय पक्षांकडून मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातात. या निवडणुकीत प्रशासनही मतदारपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना मतदारांच्या तक्रारी राहु नयेत, यासाठी निवडणूक विभागाने पावले उचलली आहेत. मतदारांच्या शंका, त्यांना येणाऱ्या अडचणी सहज सोडविण्यासाठी निवडणूक विभागाने 1950 या टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध केली असून या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना त्यांच्या अडचणींची सोडवणूक करून घेता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.