विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड

केंजळ-आनंदपूर रस्त्यावरील प्रकार
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वाई – वाईच्या पूर्व भागात केंजळ-आनंदपूर रस्त्याचे काम सुरू असताना गरज नसूनही तीस फूट रस्त्याची रुंदी करून मोठ्या प्रमाणात वाहतूक नसताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली काम करणाऱ्या ठेकेदाराने स्वहित लक्षात घेऊन प्रचंड प्रमाणात अवैधरित्या झाडांची कत्तल केली आहे. केंजळ-आनंदपूर मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेताच बेसुमार झाडाची कत्तल केली आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा प्रकार भयानक घडल्याने पर्यावरण प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्यावर इतक्‍या मोठ्या प्रमाणात कोणाचीही परवानगी न घेता सुस्थितीत असणाऱ्या झाडांची निव्वळ विकासाच्या नावाखाली कत्तल करणे हे पर्यावरणासाठी घातक बाब आहे, तसेच या सर्व प्रकारापासून बांधकाम विभाग व वनविभाग पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, सध्या वाई तालुक्‍यात बेसुमार वृक्ष तोडीचे प्रस्त वाढल्याचे चित्र आहे. सुधारणेच्या नावाखाली जवळपास 25 वर्षे जुनी झाडे बेसुमारपणे तोडण्यात आली आहेत. वास्तविक ठेकेदाराने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार या बांधकाम विभाग व वनविभाग यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.

वृक्षतोडीचे कोणत्याही विभागाला काहीही देणेघेणे नाही. ग्रामीण भागातसुध्दा काही शेतकरी कसलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे ब्रिटीश कालीन झाडे तोडण्याचे धाडस करीत आहेत. हे त्या विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल, बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे रस्ता रुंदी करण्याच्या निमित्ताने राजरोसपणे वनसंपदा नष्ट करीत असेल तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रबोधनाची आज नितांत गरज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

वणवा लावणे, अवैध वृक्षतोड करणे यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्‍यक असून कायदाचा धाक अशा प्रवृत्तींना बसणे काळाची गरज आहे. तहसीलदार, बांधकाम विभागासह वनविभाग वाई तालुक्‍यात वृक्ष संरक्षणासाठी बेसुमार वृक्ष तोड करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? हाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे सध्या दुष्काळाच्या झळा बसत असून ही परिस्थिती बदलली नाही तर महाभयंकर दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कारवाईअभावी वाढतयं धाडस

वाई तालुक्‍यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे बेसुमार वृक्षतोड झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे काहीही केल्यास कारवाई होत नाही, असा ठाम विश्‍वास झाडांची बेसुमार कत्तल करणाऱ्यांचा झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वृक्षतोडीच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, अशाचप्रकारे बेसुमार वृक्षतोडी होत राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून जोर धरू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.