हैदराबाद – ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला मुख्य प्रवर्तक असलेल्या आकासा या नागरी विमान वाहतूक कंपनीची सेवा जून महिन्यापासून सुरू होणार आहे. या कंपनीने पाच वर्षात 72 विमाने आपल्या सेवेत दाखल करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केले आहे.
आकासा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी नागरी विमान वाहतूकीवरील भारतातील प्रदर्शनात बोलताना सांगितले की, आम्ही प्रत्येक वर्षाला सेवेमध्ये नवीन विमाने दाखल करणार असून पाच वर्षांमध्ये आमच्याकडे विमानाची संख्या 72 पेक्षा जास्त असेल. आमचा गृहपाठ पूर्ण झाला आहे.
आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालय व नागरी विमान वाहतूक संचालनालयाबरोबर काम करत असून आम्हाला आवश्यक त्या सर्व परवानग्या जूनअगोदर मिळण्याची शक्यता आम्ही गृहीत धरीत आहोत.
सुरूवातीला आम्ही आमची सेवा 12 विमानाच्या मदतीने सुरू करणार असून पुढील प्रत्येक वर्षी 12 ते 14 विमाने घेण्याची आमची तयारी चालू आहे. भारतामध्ये मध्यमवर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे या वर्गाकडून आगामी काळामध्ये विमानाने प्रवास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची कंपनी सुरूवातीपासून चांगले काम करेल अशा योजना तयार करीत आहे.
सुरुवातीला मोठ्या शहरादरम्यान आणि नंतर मोठ्या शहराकडून छोट्या शहरादरम्यान विमाने सुरू करण्यात येणार आहेत. प्रथम देशातील विमानसेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल आणि त्यानंतर एक वर्षात आम्ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यामध्ये आकासाला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आवश्यक तो परवाना मिळाला आहे. भारतामध्ये विमान कंपन्यांची संख्या अगोदरच जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर जेट एअरवेज या कंपनीचे लवकरच पुनरुज्जीवन होणार आहे. अशा स्पर्धेच्या वातावरणात आकासाला आपले कामकाज सुरू करावे लागणार आहे