मुंबई – पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले.
यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय’ असं म्हणत दानवे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचेच नेते आहेत” असे वक्तव्य केले होते. याबाबत माध्यमांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. तसेच ते पुढे म्हणाले की, “बीड येथील माझ्या सभेनंतर जर कोणी तिथे आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचे लोकशाहीमध्ये स्वागत व्हायला हवे. मला आनंद आहे की वेगळी भूमिका घेतलेले लोक त्यांची भूमिका लोकांमध्ये जाऊन मांडत आहेत.” असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या भूमिकेनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.