पुणे -राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात केली आहे.
गणेशखिंड परिसरातील मोकळ्या जागेसंदर्भात मोजणी न करण्याचे कोर्टाचे आदेश असतानाही या जागेची बळजबरीने मोजणी केली जात होती. या जागेचा ताबा सध्या तक्रारदार साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. याबाबत हवेली तहसीलदार यांच्याकडेही यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. तसेच पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव असल्याने शासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मला धमकीचे दूरध्वनी येत असून, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली. मात्र, त्यावर देखील अद्याप उत्तर दिले गेलेले नाही, असे साळगावकर यांनी म्हटले आहे.
या फाइलला अजित पवार यांचे नाव असल्याने, यामध्ये माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही फाइल कोणत्याही विकास कामाची नसून, मोकळ्या जागेसंदर्भात आहे. त्यामुळे मला असे वाटते की, माझ्या जीवाला अजित पवार यांच्याकडून धोका आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगितले. त्यामुळे याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा, असे साळगावकार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
“त्यांना’ संरक्षण द्या – अजित पवार
आपण कायदा, सुव्यवस्था पाळणारे असून संविधानाला मानणारे आहोत. माझ्याकडून कोणाला राजकीय धोका असू शकतो, मात्र शारीरिक नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीला उत्तर दिले. कोणाच्या जीवाला धोका वाटत असेल तर त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावे. गरज असेल तर स्टेनगन सहित त्यांना संरक्षण द्या, असेही पवार म्हणाले. ते माध्यमांना म्हणाले, तुम्ही मला इतक़ी वर्षे ओळखता, तुम्हाला तरी वाटते का माझ्यापासून धोका आहे. मी कायदा आणि संविधान पाळणारा आहे. माझ्यामुळे राजकीय धोका असू शकतो पण शारीरिक धोका असू शकत नाही.