Ajit Pawar – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यूने आजारी (Dengue Fever) असून त्यांना ताप आणि अशक्तपणा आला होता, प्लेटलेट आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कमी झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले होते. अशात आता अजित पवारांची सार्वजनिक जीवनातील गैरहजेरी चिंतेचा विषय ठरली असताना खुद्द त्यांनीच आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे.
अजित पवार यांची फेसबुक पोस्ट
‘गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.’