पुणे – प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर आज बहुचर्चित ‘शिवभोजन’ थाळी योजनेचा राज्यभरातील विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात एकूण ११ ठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान, या योजनेच्या शुभारंभासाठी पुणे महानगरपालिकेच्या उपाहारगृहात आलेल्या अजित पवारांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यास नकार देताना दिलेल्या कारणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. याबाबत सविस्तर वृत्त असं की, अजित पवारांनी आज पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी थाळीचा आस्वाद घेणास नकार देताना म्हंटल की, ‘जर मी ही शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल अजित पवारांनी गरिबांच्या थाळीवर मारला ताव’.
अजित पवारांच्या या हजरजबाबी उत्तरामुळे उपस्थितांना हसू अनावर झालं मात्र पुढच्याच क्षणाला अजित पवार यांनी आपण ‘दीक्षित डायटवर’ असल्याने इतक्या लवकर जेवण करत नाही असं खरं कारण स्पष्ट केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून गरजुंना अन्न मिळेल असा विश्वास व्यक्त केला.