मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. उपचारांनंतर पवार यांना आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून पुढील सात दिवस ते घरीच विलगीकरणात राहणार आहेत. याबाबतची माहिती अजित पवार यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अजित पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांनी, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आणखी सात दिवस घरीच विलगीकरणात राहणार असून त्यानंतर ते पुर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत असतील.” असा संदेश दिला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आणखी सात दिवस घरीच विलगीकरणात राहणार असून त्यानंतर ते पुर्वीप्रमाणे आपल्या सर्वांसोबत असतील.
— Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2020
सदिच्छांसाठी मानले आभार
अजित पवार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर दिलेल्या संदेशात सुळे यांनी अजित पवारांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, “दादांच्या आजारपणात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व जनतेने ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे मनापासुन आभार.आपणा सर्वांच्या सदिच्छा व शुभेच्छा तसेच रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ यांचे प्रयत्न यांच्या जोरावर दादांनी कोरोनावर यशस्वी मात केली. याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार. आपण दाखविलेले प्रेम, काळजी अनमोल आहे. धन्यवाद.”