- महापालिका नगरसचिवांकडे अर्ज दाखल
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी भाजपने अखेर नाव निश्चित केले आहे. पिंपरीतील केशव घोळवे यांना अखेर भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केशव घोळवे यांनाच उपमहापौर पद देण्याचे सुचविले होते. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. सोमवारी केशव घोळवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला.
उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर उपमहापौर कोण याबाबत चर्चांना उधाण आले होते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष यांच्यात आपल्याच मतदारसंघातील नगरसेवकाला पद देण्याबाबत चढाओढ होती. मात्र भाजपमधील मुंडे गटाने मोर्चेबांधणी केली होती. आपल्याच गटातील नगरसेवकांला उपमहापौरपदाची संधी मिळावी यासाठी आमदार समर्थक प्रयत्न करीत होते. मात्र स्वतः पंकजा मुंडे यांनीच केशव घोळवे यांनाच पद देण्याची सूचना केली.
दरम्यान, नगरसेवक केशव घोळवे हे संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून भाजपकडून निवडून आले आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते पहिल्यांदाच 2017 मध्ये नगरसेवक झाले आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना उपमहापौर पद मिळण्याची शक्यता आहे.
तसेच उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला आहे.