- पक्षांतर्गत बैठकीमध्ये शिक्कामोर्तब; भोसरीकरांना मिळणार ताकद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण याबाबतचे तर्कवितर्क आज संपुष्टात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. अजित गव्हाणे यांना संधी देतानाच भोसरीत पक्षाची पुन्हा ताकद वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत राष्ट्रवादी आहे. तर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता महापालिकेवर आहे. राष्ट्रवादीने आपल्या नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्षासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी योगेश बहल, दुसऱ्या वर्षी दत्ताकाका साने तर तिसऱ्या वर्षी नाना काटे यांना संधी दिली होती. नाना काटे यांचा 1 ऑगस्ट रोजी कालावधी संपुष्टात आला होता. सध्या करोनाचा कालावधी सुरू असल्यामुळे नाना काटे यांना मुदतवाढ देण्यात यावी, असा आग्रह काटे यांच्या समर्थकांनी धरला होता. मात्र ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला एकच वर्षाचा कालावधी दिला जाणार असल्यामुळे अजित पवार यांनी काटे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्ती केली होती. मात्र खरी स्पर्धा अजित गव्हाणे, माजी महापौर वैशाली घोडेकर आणि मंगला कदम यांच्यामध्ये होती. पक्षांतर्गत स्पर्धेमध्ये अजित गव्हाणे यांनी बाजी मारली असून त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवरील व विभागीय आयुक्तांकडील नोंदणीसाठीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.
राजकीय कारकीर्द
अजित गव्हाणे हे महापालिकेवर चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सन 2002 पासून ते सलग नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पद भूषविले असून पहिली निवडणूक त्यांनी भाजपाकडून कै. अंकुश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली लढविली होती.
2007 साली अंकुश लांडगे यांच्या निधनानंतर त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. त्यांचे वडील दामोदर गव्हाणे हे देखील महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अजित गव्हाणे हे विलास लांडे यांचे निकटचे नातेवाईक असून त्यांच्या खास विश्वासूंपैकी एक समजले जातात.