नागपूर – कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या ( Karjat jamkhed MIDC ) मुद्यावरुन आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) आणि रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यात जुंपली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ‘मग मी काय करु’ असे उत्तर अजित पवार यांनी दिली. राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात अजित पवार हे भाजपच्या राम शिंदेंना बळ देत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री पवार पुढे बोलताना म्हणाले की, कर्जत जामखेडच्या एमआयडीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथे तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल, असा महायुतीचा प्रयत्न चालला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. एमआयडीसीबाबत आमदार राम शिंदे हे अतिशय बारकाईने प्रयत्नशील आहे.
ज्या ठिकाणी कर्जत जामखेडची एमआयडीसी प्रस्तावित होती, तिथे नीरव मोदींची जमीन आहे, याबाबत अजित पवारांना विचारले. यावेळी पवार म्हणाले की, नीरव मोदीची भारतात येण्याची शक्यता फार कमी आहे. ते इथे आले तर त्यांच्यावर कारवाई होईल. आपण नियमांच्या चौकटीत बसून एमआयडीसीच्या संदर्भात काम करु असे त्यांनी म्हटले आहे.
बारामतीमध्येही उमेदवार देण्याची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये दाखल झालेल्या अजित पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन देखील घेतले. इतकेच नाही तर या अधिवेशनात बारामती लोकसभा मतदारसंघासह इतरही मतदार संघात राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.