राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तक्रार ः सोमवारी अर्जावर सुनावणी
अर्शद शेख
श्रीगोंदा – नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे व राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गटनेते मनोहर पोटे यांना अपात्र ठरवावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऍड. हृषीकेश गायकवाड, माजी नगरसेवक अख्तर शेख व सतीश बोरुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. यावर सोमवारी (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम सुणावणी होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अर्जदार टिळक भोस दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, पोटे दाम्पत्य नगरपालिकेत कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करत बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला. त्यानंतर राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षाचे काम सुरू केलेले आहे. एकंदरीत पोटे दाम्पत्य हे कॉंग्रेस, भाजपा आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील झालेले आहेत.
वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे पोटे दाम्पत्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 च्या कलम (3) (1) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे आणि अर्हतेच्या तारखेपासून सहा वर्षांपर्यंत त्यांना अध्यक्ष तसेच नगरसेवक राहण्यास व होण्यास अपात्र ठरवावे, असा अर्ज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला होता. त्याची सुनावणी 7 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली असल्याचे भोस यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनावणीत काय निर्णय देतात, याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे.