अन्यथा आंदोलन छेडू मनसे पदाधिकाऱ्यांचा इशारा
शिर्डी – शहरातील दुकानांवरील असलेल्या इंग्रजी भाषेतील पाट्या तत्काळ काढून मराठी भाषेत करा; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी शिर्डी नगरपरिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत फलक असावे या संदर्भात आंदोलने झाली. या आंदोलनाला यश आले. न्यायालयानेच राज्य सरकारला या विषयाबाबत फटकारले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व व्यावसायिकांच्या व्यवसायाबाबतच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजेत, असा आदेश असतानादेखील शहरात न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ज्या व्यावसायिकांच्या इंग्रजीत पाट्या आहेत अशा व्यावसायिकांवर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करून मराठी पाट्या लावण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आठ दिवसांत शहरातील दुकानांसमोर मराठी भाषेतील पाट्या लावल्या गेल्या नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, मनविसे शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, अंबादास कांबळे, उपशहराध्यक्ष विकास बेंद्रे, उपतालुकाध्यक्ष अभिजित पोपळघट, ऋषी धीवर, चेतन झिंजाड, गौरव भालेराव आदींच्या सह्या आहेत.