पुणे – महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांमधील एक पद महापालिकेतील अधिकाऱ्यास बढतीने दिले जाणार आहे. या पदावरून माजी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे सेवा निवृत्त झाल्यानंतर अद्यापही हे पद रिक्त आहे. त्यामुळे, या पदासाठी महापालिकेकडून पात्र अधिकाऱ्यांची यादी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
या यादीत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, शासनाकडून या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे असून राज्य सरकारने एक पद महापालिकेतील अधिकाऱ्यांना बढतीने देण्यास मान्यता दिलेली आहे. पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा सुरेश जगताप झाल्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यापूर्वीच शासनाने महापालिकेकडून यादी मागविणे अपेक्षित होते.
मात्र, अधिकाऱ्यांमध्येच वाद असल्याने हे पद रिक्त राहिले. त्यानंतर आता शासनाकडे यादी पाठविण्यात आली असली तरी महापालिकेत तीनही पदांवर शासनाने अधिकारी नेमलेले आहेत. त्यातील अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून दुसरे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी एका अतिरिक्त आयुक्ताची बदली करून पालिका अधिकाऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.