पैसे परत मागितल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; तीन संशयितांवर गुन्हा
नागठाणे – तमाशाच्या फडातून मिळणार्या नफ्यामध्ये मोठा वाटा देण्याचे आमिष दाखवून, प्रसाद साहेबराव चव्हाण (रा. अतीत, ता. सातारा) यांच्याकडून 26 लाख रुपये उसने घेतले आणि ते पैसे परत मागितले म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी दत्तात्रय नाना सोनवणे, सूर्यकांत दत्तात्रय सोनवणे आणि चंद्रकांत दत्तात्रय सोनवणे (रा. अतीत) यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, प्रसाद चव्हाण हे आईसोबत अतीत रहात आहेत. त्यांचे वडील साहेबराव यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांचे घाटकोपर (मुंबई) येथील घर विकून, प्रसाद यांना 25 लाख रुपये मिळाले होते. संशयितांना 2021 साली तमाशाचा फड काढण्यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी प्रसाद यांच्याशी बैठक घेऊन गुंतवणूक करण्याची गळ घातली. तमाशाच्या फडातून मिळणार्या नफ्यात 25 ते 30 टक्के वाटा देण्याचे संशयितांनी कबूल केले.
प्रसाद चव्हाण यांचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयितांनी सप्टेंबर 2021 ते जून 2023 पर्यंत वेळोवेळी बँक व्यवहारातून 26 लाख 25 हजार 380 रुपये उसने घेतले. ही रक्कम चव्हाण यांनी परत मागितली असता, संशयितांनी त्यांना अॅट्रॉसिटी आणि सावकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रसाद चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक फौजदार हिम्मत दबडे-पाटील तपास करत आहेत.