श्रीरामपूर – श्रीरामपूर एमआयडीसीतील गोडाऊन फोडून ३ लाख ५६ हजार ८२५ रुपये किंमतीचा १५८ पोते गहू चोरून नेण्याची खळबळजनक घटना घडली .
याबाबत, शशिकांत वामनराव पाटील (वय ५२) यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषि अभियंता म्हणून काम करतो. महाबिजच्या अतिरिक्त बियाणांची साठवणूक खासगी, गोडाऊनमध्ये केली जाते. गोपाल झंवर यांच्या एमआयडीसी येथील खासगी गोडाऊनमध्ये महाबीजचा गहू साठवलेला आहे.
दि. १९ एप्रिल रोजी ३ शटर असणाऱ्या आणि बाहेरून कुलूप लावलेल्या या गोडाऊनचे मुख्य शटरचे सीलबंद कुलूप उघडून आत पाहिले असता आतमधील गव्हाच्या गोण्या कमी असल्याचे लक्षात आले. शटरची पाहणी केली असता एका शटरचे नटबोल्ट काढल्याचे दिसले. त्यामुळे या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या ठिकाणी कामाला असणारे कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक सागर शिंदे हे गोडाऊनची पाहणी करायला गेले असता त्यांना बियाणांचे पोते अस्तव्यस्त दिसले.
पोत्यांच्या थप्पीही कमी झाल्याचे दिसले. चोरट्याने लोखंडी तारेचे कुंपण कशाच्यातरी सहाय्याने कट करून गोडाऊनचे लोखंडी शटरचे आतील नटबोल्ट काढून १५८ पोते गहू चोरून नेला. १८ एप्रिलच्या सायंकाळी ६.३० ते १९ एप्रिलच्या सकाळी १०.१५ या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.