वॉशिंग्टन – आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा निवडून आलो तर पहिल्याच महिन्यात इराणशी करार होंईल. तसेच पॅलेस्टाईनचा विषयही रूळावर येईल आणि मध्यपूर्वेत चिरस्थायी शांतता नांदेल, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
ट्रम्प यांच्या मध्यस्थीनेच इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीत पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या व ट्रम्प यांच्या उपस्थितीतच राजनैतिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. स्वतः ट्रम्प यांनी आज ही माहिती दिली.
ते म्हणाले की, या महत्त्वाच्या व ऐतिहासिक करारामुळे आता आखातातील अन्यही देश तशाच स्वरूपाचे इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे करार करीत आहेत. सौदी अरेबियांच्या राजांशीही मी बोललो आहे. आम्ही सुरुवात केली आहे आणि त्यांनाही आम्ही आता इस्रायलबरोबर आणणार आहोत. मी पुन्हा निवडून आल्यावर इराणही ताळ्यावर येईल आणि एका आठवड्यात ते अमेरिकेशी करार करण्यास तयार होतील. पण एक आठवड्याच्या ऐवजी आम्ही फार तर एक महिन्याचा कालावधी घेऊ.
आतापर्यंत इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टाईनला समर्थन देणारे देश एकामागून एक इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करीत आहेत हे पाहून पॅलेस्टाईनही याच प्रक्रियेत सामील होईल आणि मध्यपूर्वेत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही पॅलेस्टाईनला दरवर्षी 750 दशलक्ष डॉलर्सची मदत देत होतो. पण ते शांततेसाठीच्या चर्चेला तयार होत नव्हते म्हणून मीच त्यांची ही मदत बंद केली. पण आता ते जर तयार झाले तर त्यांना पुन्हा ही मदत सुरू करता येईल असेही ट्रम्प यांनी नमूद केले.