पुणे- राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी मागील 10 दिवसांपासून होत असतानाच शासनाने अचानक रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एका हाताने शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत देताना दुसऱ्या हाताने नागरिकांच्या खिशातून ही रक्कम पुन्हा वसुल करण्याची चलाखी केली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या रेडीरेकनरच्या दरात राज्यात सरासरी 1.74 तक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वाधिक सरासरी 3.91 वाढ ही पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुणे मनपामध्ये 1.25 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 3.41 टक्के आणि ग्रामीण भागात 8.62 टक्के इतकी वाढ करण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार (दि.12) पासून होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे घरांच्या किंमती वाढणार आहेत.
नोंदणी व मुद्रांक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे नोंदणी महानिरिक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी नोंदणी सहनोंदणी महानिरिक्षक ज्ञानेश्वर खिलारी, सहसंचालक नगररचना मुल्यांकन विजयकुमार गोस्वामी उपस्थित होते.
राज्यात दरवर्षी दि.1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर लागू होतात. यंदामात्र करोनाचे संकट आल्याने रेडी रेकनरचे नवे दर जाहीर करण्यात आले नव्हते. आता, मात्र शासनाने रेडीरेकनरमध्ये वाढ केली करीत याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
2018-19 आणि 2019-20 या दोन वर्षात नोटबंदी आणि बाजारातील मंदी पाहता रेडी रेकनरमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. तर, 2020 या वर्षातील एप्रिल ते ऑगस्टपर्यंत रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते.
राज्यातील ग्रामीण क्षेत्रात गावांमध्ये सरासरी 2.81 टक्के, प्रभाव क्षेत्रातील गवांमध्ये सरासरी 1.89 टक्के, नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रात 1.29 टक्के तर महापालिकेच्या हद्दीत सरासरी 1.74 टक्के वाढ करण्यात आली आहे. आर्थिक मंदी आणि करोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन रेडी-रेकनरच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख शहरांमधील वाढ
* नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी 1.64 टक्के तर मनपा हद्दीमध्ये 0.74 टक्के वाढ
* ठाणे जिल्ह्यात सरासरी 1.42 टक्के तर ठाणे मनपा हद्दीमध्ये 0.36 टक्के, नवी मुंबईमध्ये 0.99 टक्के,
* रायगड जिल्ह्यात सरासरी 3 टक्के वाढ
* नागपूर जिल्ह्यात सरासरी 0.60 टक्के तर नागरपूर मनपाहद्दीत 0.1 टक्के वाढ
* सातारा जिल्ह्यात 2.23 टक्के वाढ
* सांगली जिल्ह्यात 1.59 टक्के वाढ
* कोल्हापूर जिल्ह्यात 1.51 टक्के वाढ तर कोल्हापूर मनपा हद्दीत 0.49 टक्के वाढ
* सोलापूर जिल्ह्यात सरासरी 1.27 टक्के वाढ