ठाणे – येथील विद्याप्रसारक मंडळाच्या बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील “एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना तालिबानी शिक्षा देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोशी-बेडेकर कॉलेजच्या मैदानात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे प्रशिक्षण दिले जाते. या अंतर्गत विद्यार्थ्याना आर्मी व नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्व तयारीचे धडे दिले जातात. त्यात विद्यार्थ्यांकडून एखादी किरकोळ चूक झाल्यास त्यांना तालिबानी पद्धतीची अमानुष शिक्षा दिली जाते.
व्हायरल व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोके टाकून पायावर उभे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी या स्थितीत अवघडून उभे असताना त्यांचा सीनिअर विद्यार्थी त्यांच्या पाठीवर मारहाण करतो. या मारहाणीमुळे एक विद्यार्थी अक्षरशः कळवळताना व्हिडिओत दिसून येत आहे.
मारहाण करणाऱ्या सीनिअर विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये एवढी दहशत आहे की, ज्यूनिअर विद्यार्थी त्यांच्यापुढे तोंडही उघडत नाहीत. एवढेच नाही तर त्यांचे पालकही समोर येऊन उघडपणे तक्रार करत नाहीत. पण महाविद्यालयातीलच एका सुजाण विद्यार्थ्याने धाडस दाखवत हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये शूट केला अन् हा अघोरी प्रकार उघडा पाडला आहे.
कॉलेज प्रशासनाची कारवाईची ग्वाही
दुसरीकडे, बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्यांनीही शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. पण त्यानंतरही एकही विद्यार्थी समोर आला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
त्यांनी महाविद्यालय प्रशासन असे प्रकार खपवून घेणार नाही. तसेच शिक्षकांच्या गैरहजेरीत हा प्रकार झाला असून, संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, असे सांगितले आहे.