न्यूयॉर्क : अमेरिकेतील गोळीबाराच्या सत्रात आणखी किती जणांचे जीव जाणार आहेत कोणास ठाऊक. कारण पुन्हा एकदा इथे एक निष्पाप जीवाचा बळी पडला आहे. यावेळी गोळीबार करणारा चक्क प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी होता. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा अमेरिका हादरली आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात एक शिक्षिका गंभीर जखमी झाली. तात्काळ शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी सविस्तर माहिती दिली नसली, तरी व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या गोळीबारात एकही विद्यार्थी जखमी झालेला नाही.
व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्याचं वय किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलं नसलं तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये, गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. न्यूपोर्टचे पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात कॉलवर माहिती मिळाली. माहिती मिळताच आमचं पथक घटनास्थळी पोहोचलं.
शाळा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जखमी शिक्षिकेला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांसोबत घरी सोडलं जात आहे. पुढील तपासानंतर याप्रकरणासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.