मुंबई – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घडामोडीनंतर राज्य सरकाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना याची माहिती दिली आहे.
मंगल प्रभात लोढा माध्यमांना बोलतांना पुढे म्हणाले,’महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना घडेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, म्हणून सरकारने योग्य निर्णय घेतला आहे.’
राज्य सरकारने काढलेले निर्देश पुढील प्रमाणे आहे
-दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत,
– जोपर्यंत उन्हाची दाहक स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या जागेत कोणताही कार्यक्रम घेऊ नये, हा चांगला निर्णय आहे. जनतेने या निर्णयाचे पालन करावे. असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.