शेतकऱ्यांनंतर आता कामगारांवर वार – राहुल गांधी

नवी दिल्ली – शेतीविषयक विधेयकांपाठोपाठ कामगार सुधारणा कायद्यांवरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनंतर आता कामगारांवर वार करण्यात आल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संसदेने कामगार सुधारणांशी संबंधित तीन विधेयकांना मंजुरी दिली. त्यातील तरतुदींमुळे 300 कामगार क्षमता असणाऱ्या कंपन्या सरकारच्या परवानगीविना कामगार कपात करू शकणार आहेत. याआधी 100 कामगार क्षमता असणाऱ्या कंपन्या तसे करू शकत होत्या. त्या तरतुदींचा संदर्भ देऊन राहुल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या राजवटीत गरिबांचे शोषण आणि उद्योगपती मित्रांचे पोषण केले जाते, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस तज्ज्ञांशी साधलेल्या संवादाचीही त्यांनी खिल्ली उडवली. शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याऐवजी मोदी सरकार जनसंपर्क वाढवण्यात गुंतले आहे, असा शाब्दिक टोला राहुल यांनी लगावला.

कॉंग्रेस नेत्या आणि राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. सध्याच्या कठीण काळात कुणाची नोकरी न जाता उपजीविकेचे साधन सुरक्षित राहण्याची गरज आहे. मात्र, मोदी सरकारने आणलेल्या कायद्यामुळे कामगारांना नोकरीवरून काढून टाकणे सोपे बनले आहे. सरकारने अत्याचार सुलभ केले आहेत, असे ट्‌विट प्रियांका यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.