नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणीकडे जगाचे लक्ष लागले असताना आता दुसरीकडे माता सीतेची जन्मभूमी भव्यदिव्य करण्यासाठी आता जय्यत तयारी राज्य सरकारकडून सुरू झाली आहे. वास्तविक सीतेचे जन्मस्थान बिहारमधील सीतामढी येथे आहे. पनौरा धाम जानकीदेवी मंदिर येथे पूर्वीपासून आहे, मात्र आता ते विकसित करण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
बिहार सरकारने पनौरा धाम जानकी देवी मंदिराचा विकास करण्यासाठी ७२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला होता. या बैठकीबाबत बोलताना मंत्रिमंडळ सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस सिद्धार्थ यांनी या प्रस्तावावविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना,”सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम जानकी मंदिराच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने ७२.४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत नितीश सरकार सीतामढी जिल्ह्यात ‘सीता-वाटिका’, ‘लव-कुश वाटिका’ विकसित करणार आहे. याशिवाय ‘परिक्रमा’ मार्ग बांधण्यात येणार आहे. डिस्प्ले किऑस्क, कॅफेटेरिया, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तयार केली जाईल. कॅबिनेट सचिवांच्या म्हणण्यानुसार, येथे येणारे सर्व लिंक रोड जोडले जातील आणि या तीर्थक्षेत्राचाही लवकरात लवकर विकास केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय जागेभोवती थीमॅटिक गेट्स आणि पार्किंग एरियाही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय गयाजी धाम येथे यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी 120.15 कोटी रुपयांच्या बजेटलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गयाच्या विष्णुपद मंदिरात दरवर्षी पितृ पक्ष मेळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये मोठी गर्दी होते. विष्णुपद मंदिरात पिंड दान विधी करण्यासाठी लाखो लोक येतात. हे लक्षात घेऊन सरकारने 1000 खाटांची धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.