बंगळुरु : कर्नाटकात भारतीय जनता पक्षात सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण भाजपच्या एका आमदाराने चक्क पक्षात येण्यासाठी आपल्याला मोठ्या रक्कमेची ऑफर देण्यात आल्याचा खुलासा केला आहे. काँग्रेसची साथ सोडून भाजपात सहभागी झालेल्या आमदार श्रीमंत पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा भारतीय जनता पार्टीने मला सोबत येण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानानंतर विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली. आमदार श्रीमंत पाटील यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? तेव्हा मी एक रुपयाही घेतला नाही असे त्यांनी सांगितले. परंतु श्रीमंत पाटील यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपाने मला पैसे ऑफर केले नव्हते असे मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असा आरोप त्यांनी केला.
श्रीमंत पाटील हे कर्नाटकच्या कागवाड परिसरातील आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीही होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्यातील श्रीमंत पाटील हे एक आमदार होते. सध्याच्या कॅबिनेटबद्दल आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मला कॅबिनेटमध्ये का घेतलं नाही हे सांगता येत नाही. परंतु कॅबिनेट विस्तारावेळी मला सहभागी करुन घेतले जाईल असे पक्षाने म्हटले आहे.
भाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल असा दावा त्यांनी केला. मराठा समुदायाला मी मंत्री व्हावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.