पिंपरी – स्कॉलरशिपच्या परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके महापालिका शिक्षण विभागाला मिळाली आहेत. बालभारती पुणेकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षेला बसलेल्या 1 हजार 24 विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप देखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पुस्तके प्राप्त झाल्याने शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. दैनिक प्रभात ने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत पुस्तके मागवून वाटपास सुरुवात केली आहे.
फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवीन पुस्तके वेळेत दिली जात नाहीत. परिणामी शिक्षकांना जुन्याच पुस्तकांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. या वर दै. प्रभात मध्ये सविस्तर वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाने त्वरीत बालभारतीकडे पुस्तके मागवून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था केली.
स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके परीक्षेच्या तोंडावर मिळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक मागील वर्षांतील मुलांची पुस्तके जमा करुन ठेवतात. त्याचा उपयोग पुढील वर्षी करतात. ही जमा केलेली पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याची वेळ येत होती. मुलांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना वाचण्यासाठी ती मिळत नव्हती. शिक्षकांनाही पुस्तकांची अदलाबदल करुन शिकविण्याची वेळ येते.
यंदाही बालभारतीकडून पुस्तके मागवायची की इतरांकडून या द्विधा मनस्थितीत शिक्षण विभाग होता. या बाबत प्रभात मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने बालभारतीकडून पुस्तके मागवली असून ती शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली आहे. त्याचे वाटप देखील करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
बालभारतीकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. पुस्तके महापालिकेकडे उपलब्ध झाली आहेत. परीक्षेला 1 हजार 24 विद्यार्थी बसलेले आहेत. त्यांच्यापर्यंत पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त.