श्रीनगर: काश्मिरातील फुटीरवाद्यांची मोठी संघटना असलेल्या हुर्रियत परिषदेतून या संघटनेचे अध्यक्ष सय्यद अलिशा गिलानी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या संघटनेत उभी फूट पडल्याचे मानले जात आहे. सन 2003 पासून हुर्रियत परिषद कार्यरत आहे.
गिलानी यांनी चार ओळींचे राजीनामापत्र पाठवून आपण या संघटनेपासून आता फारकत घेत आहोत, असे म्हटले आहे. 90 वर्षीैय गिलानी या संघटनेचे सर्वात ज्येष्ठ व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. या संघटनेचे ते तहहयात अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे फुटीरवाद्यांच्या संघटनेला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मिरातील हुर्रियत परिषदेच्या काही जणांच्या कारवायांवर गिलानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या लोकांनी तेथील सरकारमध्ये पदे मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ती बाब आपल्याला पसंत नाही. असे असतानाही
हुर्रियत परिषदेने मात्र त्यांच्या कृतीचे समर्थन करणे सुरू केल्याने आपण राजीनामा देत आहोत असे गिलानी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
जम्मू-काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असतानाही हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना त्या विषयी अकार्यक्षमता दाखवून कोणतीच हालचाल केली नाही म्हणूनही त्यांनी आगपाखड केली आहे. आपल्या नेतृत्वाच्या विरोधात बंडखोरीलाही प्रोत्साहन दिले गेले जात असल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.