शिक्षक आमदार विक्रम काळे यांचनी व्यक्त केली खंत
सासवड : मुलं आणणे आणि टिकवून ठेवणे हे मराठी माध्यमाच्या शाळांपुढील आव्हान असून विद्यार्थी संख्येचे मोठे संकट आहे. विद्यार्थी हे दैवत असून यामुळेच शाळा आणि शिक्षक टिकून आहे. मात्र सध्या पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. पुढील काळात मराठी माध्यमाच्या शाळांतील 5 ते 7 पर्यंतचे वर्ग बंद पडून हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता व्यक्त करीत शिक्षकांनो विद्यार्थ्यांची काळजी करा, शिक्षक पदाचा दर्जा टिकवा असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज नगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम विक्रम काळे यांनी केले.
सासवड येथे शिक्षणमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून संत सोपानकाका सहकारी बॅंक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांनी पुणे विभागातील सुमारे 3 हजार माध्यमिक विद्यालयांत राबविलेल्या “संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियाना’चा बक्षीस वितरण समारंभ आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदार विक्रम काळे व पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार संजय जगताप, आमदार जयंत आसगावकर आणि आमदार विक्रम काळे यांकडे उपस्थित पुणे विभागातील शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी आदी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यावर उपस्थित तीनही आमदारांनी विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बाजी लावू हा शब्द दिला.
आमदार जगतापांचा दातृत्व गुण
छत्रपती संभाजी महाराज नगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पैसा संपत्ती असून चालत नाही तर दातृत्व गुण असायला पाहिजे आणि आमदार संजय जगताप यांच्यातील दातृत्व गुण महत्त्वाचा असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच जिल्हा बॅंकेने या उपक्रमासाठी 5 लाखांचा हातभार लावावा, अशी मागणी आमदार काळे यांनी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांकडे केली.