पुणे – गुजरात बर्फीचा वापर करून मिठाई बनविणाऱ्या दुकानदारावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने कारवाई (दि.17) करीत अशोक राजाराम चौधरी याच्या वाहनांतून गुजरात बर्फीचा स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाइट, स्पेशल बर्फी अन्न पदार्थांचे सहा नमुने तपासणीसाठी घेत उर्वरित पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पुणे शहरातील मंडईतील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, कोंढवा बुद्रुक मधील मानसरोवर येथील मे. कृष्णा डेअरी फार्म, देहूरोड, गहुंजे येथील मे. अशोक राजाराम चौधरी आणि बालेवाडी येथील हिरसिंग रामसिंग पुरोहित यांनी हा भेसळयुक्त मिठाईचा माल गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथून मागवला असल्याचे आढळून आल्याचे तसेच संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे “एफडीए’कडून सांगण्यात आले.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्नप पदार्थ, मिठाई तपासणी नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक 1 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत मिठाई, खवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, तूप इतर अन्नपदार्थांची तपासणी करून माल ताब्यात घेण्यात आला.
मिठाईच्या बॉक्सवरही “बेस्ट बिफोर दिनांक’ नमूद करणे बंधनकारक आहे, याशिवाय मिठाई बनविण्यासाठी वरील प्रकारच्या स्वीट खवाचा वापर करू नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर केल्याचे आढळल्यास संबंधिता विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
– संजय नारागुडे, सहआयुक्त (अन्न), “एफडीए’