शेखर सिंह; बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक
सातारा (प्रतिनिधी) – कोविड19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे, कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविड19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 17 बालकांची आणि एक पालक गमावलेल्या 597 बालकांची माहिती जिल्हा व बालविकास अधिकारी कार्यालयास मिळाली आहे. त्यापैकी दोन पालक गमावलेल्या 17 व एक पालक गमावलेल्या 522 बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल करण्यात आले आहेत.
कोविड19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 15 व एक पालक गमावलेल्या 507 बालकांना बालकल्याण समितीमार्फत आदेश मिळवून बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या यादीतील 2902 विधवांपैकी 422 महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. विधवा व अनाथ बालकांना त्यांचे मालमत्ता विषयक हक्क देण्याबाबत निर्देश दिले.
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 15 पैकी चार बालकांच्या वारस नोंदी स्थावर मालमत्तांवर केल्या आहेत. 15 बालकांना अनाथ प्रमाणपत्र व पाच लाख रुपयांच्या मुदत ठेव पावत्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लवकरच देण्यात येणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.