हिंगोली – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी गंभीर चुक केली आहे. नवघरे हे महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढले व महाराजांना पुष्पहार अर्पण केला. आपली चुक लक्षात आल्यावर आमदाराने लगेच माफी देखील मागितली. माफी मागताना आमदार नवघरे यांना अश्रू अनावर झाले आहे.
नवघरे यांच्या या गंभीर चुकीमुळे सर्वत्र टीका होत आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात हा धक्कादायक प्रकार घडला असून आमदार नवघऱे यांचा पुष्पहार अर्पण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. नवघरे यांनी आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत माफी देखील मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मात्र, असं करताना राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
नवघरे यांनी व्यक्त केली दिलगीरी
वसमत येथे पुतळा उभारावा यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नाला यश देखील आले. त्यामुळेच आम्ही सर्वपक्षीय पुतळा शहरात दाखल झाल्याच्या आनंदामध्ये स्वागत करत होतो.
सर्वांच्या वतीने मला पुष्पहार अर्पण करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुढे आलो होतो. माझ्याकडून जे घडले त्या कृतीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले.