जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग परिसरात शुकशुकाट
पुणे – राज्यातील सत्तेची गणिते सध्या तरी जुळली असल्याचे दिसत असले तरी गेल्या 15 दिवसांपासून सुरू असणाऱ्या सत्तेच्या खेळामुळे मात्र प्रशासकीय पातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. नेहमी गजबजलेले असणारे जिल्हाधिकारी कार्यालय व सेंट्रल बिल्डिंगचा परिसरात सध्या शुकशुकाट दिसत आहे.
सध्या राज्यात काळजीवाहू सरकार कारभार पाहत आहे. या सरकारला कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नियमित काम व्यतिरिक्त सध्या कुठलेच काम शासकीय कार्यालयात होताना दिसत नाही. प्रत्यक्षात राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या राज्यात सर्वत्र सुरू आहे. हे काम सुरू अंतीम टप्यात आले आहे. या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
सध्या तरी पंचनामे झाले असले तरी पुढील कुठलीही कार्यवाही होऊ शकत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय इतर कामांसाठी सुद्धा सरकारी कार्यालयांमध्ये जनसामान्यांची गर्दी असते. ही गर्दीसुद्धा दिवाळीनंतर कमी झालेली दिसत आहे.
सरकारी अधिकारी सुद्धा दिवाळी नंतरच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत. त्याचबरोबर आधी निवडणूक आचारसहिंता त्यानंतर दिवाळी त्यामुळे रखडलेल्या फाईल्स आता राज्यात सरकार नसल्यामुळे अडकल्या आहेत. याशिवाय निवडणुकांमुळे झालेल्या प्रशासकीय बदल्यासुद्धा रखडल्या आहेत. काही फाईल्समुळे जनहिताची कामे रखडल्यामुळे सत्ता समिकरणे जुळल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला प्रशासनातील रखडलेली कामे पूर्ण करावी लागणार आहेत.