जुन्नरमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर बस स्थानकात एका संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीकडून मंगळवारी (दि. १२) पहाटे देशी बनावटीच्या पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग पुणे ग्रामीणने ही कारवाई केली असून आदिनाथ दिलीप जाधव (वय-२२, रा. जामगाव, ता.गंगापूर, औरंगाबाद) या इसमाला दुचाकीसह अटक करण्यात आले आहे.

मंगळवारी पहाटे गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला हा संशयित इसम बसस्थानक आवारात आढळल्यावर पोलिसांनी त्याची झडती घेतली होती. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांचे आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दिपक साबळे व पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.

देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुसे, दुचाकी आदी मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करून आरोपीला मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने सदरचा कट्टा व काडतुसे कोणत्या हेतूने जुन्नरला आणली होती, हे जबाबानंतर उघड होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.