पिंपरी -शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने यंदा विशेष भर दिला आहे. नागरिकांनी शाडू माती, तुरटी, कागदी लगदा आदींपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक व विघटनशील मूर्तींना प्राधान्य द्यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला प्रतिबंध असणार आहे. गणेशोत्सव पर्यावरपूरक व्हावा, यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रयत्नशिल राहणार आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. महापालिकेकडून त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोशल मीडिया व विविध माध्यमांतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आवाहन केले जात आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली. बोदडे म्हणाले, विघटनशील गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा गणेश विसर्जनासाठी
कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करून दिले जाणार नाही. विसर्जन घाटांचा परिसर बंद करण्यात येणार आहे. मूर्तीदान व निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था केली जाणार आहे. घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ही व्यवस्था असेल. स्वीकारलेल्या गणेश मूर्तींचे खाणीमध्ये विधिवत विसर्जन केले जाईल. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. गणेशमूर्तीसाठी विषारी व अविघटनशील रासायनिक रंग वापरण्यास मनाई केली आहे.
सोसायट्यांमध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव
शहरातील सोसायट्यांमध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशन व अन्य काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका भवनात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकारी अभियंता (पर्यावरण) संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सोसायटीतील रहिवाशांनी पर्यावरणपूरक आणि शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवाव्या. सोसायटीच्या परिसरात गर्दी टाळावी. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गणेश आरती व अन्य कार्यक्रम घ्यावे. गणेशमूर्तीला सजावट करतानाही प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या वस्तूंचा वापर करू नये. अन्य लोकांनी फेसबुक लाइव्ह व ऑनलाइन माध्यमातून त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला अनुसरून आम्ही सोसायट्यांमध्ये “इको-फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी डोमसे-सवाई यांनी दिली.