देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूत भाविक वारकऱ्यांनी पालखी सोहळयासाठी गर्दी वाढत चालली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पालखी प्रस्थान ठेवणार आहे. रविवारी तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. सोहळ्यासाठी प्रशासन भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या आणि नेहमी होणाऱ्या गर्दी पेक्षा जास्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिंड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. मुख्य वैकुंठ स्थान मंदिरात सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत.
खासगी संस्थाचीही घेणार मदत
इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करतात. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गजराज बोटींग क्लबच्या जीव रक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच घाट परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि विद्युत दिवे,हॅलोजन,हायमास्क सज्ज करण्यात आले आहे.
या मार्गावर असणार वाहनांना बंदी
प्रस्थान व मार्गस्थ दिनी दिवसभर देहूत येणाऱ्या सर्व मार्गावर म्हणजेच देहूरोड ते देहू, आळंदी मार्गे तळवडे,चाकण-तळेगाव महामार्गावरील देहूफाटा मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. देहूत प्रवेश करणाऱ्या चौक, काळोखे चौक भैरवनाथ चौक साईराज चौक आयटी पार्क तवडे आदी भागात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. वाहतूक विभागाचे 11 पोलीस निरीक्षक, 15 अधिकारी, 204 वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी असणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. तर रस्त्याच्या दुर्तफा उभ्या वाहनांवर, रस्त्यावरच लावण्यात येणारे हातगाडया, पथारीवाले यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रस्थान दिनी आणि पालखी सोहळा मार्गस्थ होताना ग्रामस्थांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. तसेच पालखी सोहळ्या दरम्यान रस्त्यांवर आणून येत असे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले आहे.
इतरही तयारी सुरू
महावितरणाकडून अखंडीत विद्युत पुरवठा, गावाबाहेर राज्य परिवहनचे एसटी बसेस, पीएमपीएमएलच्या बसेससाठी तात्पुरते स्थानक उभारणार असून, जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, परिचारीका यांच्यासह पुरेसा औषध साठा, विविध चार ठिकाणी बाहयरूग्ण विभाग उभारण्यात आली असून रुग्णवाहीका सज्ज करण्यात आली आहेत.
24 तास शुद्ध पाण्याचा पुरवठा
देहू नगरपंचायतीच्या वतीने चोवीस तास अखंडीत शुद्ध पाणी पुरवठा, शुद्ध पाण्यासाठी मेडिक्लोर औषध उपलब्ध करण्यात आले आहे. फिरते शौचालय उभारण्यात आले असून सुलभ शौचालय यात्रा काळात मोफत करण्यात आले आहे. पाण्याचा टॅंकर उपलब्ध झाले असून आणखी काही टॅंकर उपलब्ध करण्यात येणार आहेत. स्वच्छता, साफसफाई, औषध, धूर फवारणी, डी.डी. पावडर टाकण्यात येत आहे. तसेच नगरपंचायत कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण पथक आणि सर्व सूचना व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सज्ज करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.
असा असणार पोलीस बंदोबस्त
3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 60 पोलीस अधिकारी, 375 पोलीस कर्मचारी, 200 होमगार्ड,राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, क्यूआरटी (शीघ्र प्रतिसाद दल), स्ट्रायकिंग फोर्स, एक 1 पथक साध्या वेशातील गुन्हे अन्वेषण पथकासह, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दामिनी पथक, दंगा काबू पथक, असणार आहे. याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
शनिवारी पालखी सोहळ्यातील होणारे धार्मिक कार्यक्रम
पहाटे 5.00 वाजता – श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखूमाई महापूजा
पहाटे 5.30 वाजता – तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा
सकाळी 9 ते 11 वाजता – श्री संत तुकाराम महाराज पादुका पुजन, इनामदार वाडा.
सकाळी 10 ते 12 वाजता – देहूकर महाराज यांचे पालखी प्रस्थान सोहळा काला किर्तन
दुपारी 2.00 वाजता – पालखी प्रस्थान सोहळा
सायंकाळी 5.00 वाजता – पालखी प्रदक्षिणा
सायंकाळी 6.30 वाजता – पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.
रात्री 9 वा किर्तन, जागर