सांगवी – अवघ्या 75 तासांत उभारलेल्या पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर येथील 8 टू 80 पार्क समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या पार्क समोर लावण्यात येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे याबाबत नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
पिंपळे गुरवकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले हे उद्यान विविध कारणांनी चर्चेत असते. उन्हाळा सुटी असल्याने लहान मुलांना घेऊन पालक या उद्यानात येतात. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहने पार्क करायला जागाच नसल्याने नागरिक जागा मिळेल तिथे बेशिस्तपणे वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे पिंपळे सौदागर येथून येणाऱ्या खासगी बस, पीएमपीएलच्या बसला पिंपळे गुरवकडे वळताना मोठा अडथळा पार करावा लागतो. त्यामुळे सुदर्शन चौकात 8 टू 80 पार्क समोर बेशिस्तपणे वाहने पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा नाहक त्रास पीएमपीएलमधील प्रवाशांना, खासगी बसेसमधील चाकरमान्यांना, वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
सायंकाळच्या सुमारास पिंपळे सौदागरहून 8 टू 80 पार्क येथे वाहने येताच अनेकदा पीएमपीएल बस, खासगी बसेस आल्यास वळण घेत असताना बेशिस्त वाहने पार्क केल्याने वळण बसत नाही. त्यामुळे वारंवार या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास वाहतूक ठप्प होत आहे. अशा बेशिस्तपणे गाड्या पार्क केलेले वाहनचालक तासनतास पार्कमध्ये जाऊन बसलेले असतात. ते जेव्हा येतील तेव्हा वाहन काढल्यावरच वाहतूक कोंडी सुटते. अनेकदा पार्कमध्ये जाऊन प्रत्येकाला विचारावे लागते की या नंबरचे वाहन तुमचे आहे का? कधी एखादा सापडतो तर कधी सापडतच नाही.
या पार्कसमोर सांगवी वाहतूक विभागाने कायमस्वरूपी वाहतूक नियमन करण्यासाठी कर्मचारी नेमणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून वाहनांना सुरळीत मार्ग मिळेल. वाहतूक विभागाकडे तक्रार केल्यापुरते एक दोन दिवस वाहतूक पोलीस नेमणूक केली जाते. नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सांगवी वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
– तानाजी जवळकर, सामाजिक कार्यकर्ते
मी नियमितपणे येथून प्रवास करते. मात्र, येथील वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे पार्क करून गेल्याने बस अर्धा अर्धा तास थांबून राहते. त्यामुळे अनेकदा बसमधून खाली उतरून चालत जावे लागते.
– एक महिला प्रवासी,,पिंपळे गुरव.