आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. वारकरी, भाविक आता आळंदीत येण्यास सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना सेवा, सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. तर दुसरीकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे. जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती, टीसीएल पावडर व इतर साहित्य खरेदी इत्यादी तयारी पूर्ण झाली असून शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाइप लाइन टाकून काम पालिकेने केले आहे. तसेच शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरात तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 17 हायमास्ट बसवण्यात आले आहेत. शहरातील मोबाइल टॉयलेटना विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वच्छतेसाठी कर्मचारी 24 तास तैनात
आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी आदी कामे 24 तास केली जाणार आहेत. नगरपरिषदेच्या 12 घंटागाड्या, 3 कॉम्पाक्टर, 5 टॅक्टर, सक्शन मशीन आदी वाहनांसह 100 सफाई कर्मचारी 24 तास तैनात असणार आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण 356 सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण 490 सिट्स सह, 1500 मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.