पिंपरी -राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहर दत्तक घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडचा मुंबईच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आदित्य ठाकरे हे शहर दत्तक घेणार असल्याचा दावा शिवसेनेचे संपर्क नेते सचिन आहिर यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आहिर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराचा मुंबईच्या धर्तीवर विकास करण्यासाठी हे शहर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दत्तक घेणार आहेत. त्या दृष्टीने शिवसेनेने नियोजन करून तयारी करून ठेवली आहे.
महापालिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार ऍड, गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर, उर्मिला काळभोर, नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी आहिर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारच्या नगरसचिव खात्याने महापालिकेकडून अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर नक्की कारवाई होईल. खासदार संजय राऊत यांनी स्मार्ट सिटीबाबत तक्रार केली आहे. मात्र, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे या प्रश्नासाठी वेळ नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. या संदर्भात नगरसचिव खात्याने महापालिकेकडे अहवाल मागितला आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने केलेली पाच मोठी कामे दाखवा
भ्रष्टाचाराचा मुद्दा करून तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून आश्वासन दिल्याने मोठ्या विश्वासाने पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी त्यांना महापालिकेत बहुमत दिले. पालिकेसह राज्य व केंद्रात भाजपची सत्ता होती. असे असतानाही त्यांना शहरासाठी मोठे कामे व प्रकल्प करता आलेली नाहीत. त्यांनी गेल्या 5 वर्षांत केलेली 5 मोठी कामे दाखवावीत असे आव्हानही आहिर यांनी केले.
अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आमच्या सोबत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी जो पक्ष ज्या ठिकाणी मोठा आहे, त्यांनी पुढाकार घेऊन आघाडीबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यात राष्ट्रवादीने चर्चेसाठी प्रथम पाऊल टाकणे आवश्यक आहे. आघाडी करणार किंवा नाही हे त्यांनी चर्चा करून स्पष्टपणे सांगावे. शिवसेना निवडणुकीसाठी सक्षम आहे. त्यामुळे एकत्र आले तर महाविकास आघाडी म्हणून अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवू असेही सचिन आहिर यांनी सांगितले.