अहमदनगर –
अवैध व्यवसायाबाबत पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून तिघांनी दोन जणांवर केलेल्या तलवारीच्या वारमध्ये एक जण जागीच खून झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी मध्यरात्री 1 ते दीडच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर जाधव मळा परिसरात ही घटना घडली.
ओंकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24, रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे. तर शुभम पडोळे (रा.नगर) हा जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. याबाबत ओंकार रमेश घोलप (वय 26, रा. माणिक चौक) याच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आहे.
गणेश केरुप्पा हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा (सर्व रा. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की, गणेश केरुप्पा हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आहेत. गणेश हुच्चे याने फिर्यादी घोलपसह व ओंकार भागानगरे यांच्याविरुध्द यापूर्वी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्याचा घोलप व भागानगरे यांच्याशी वाद आहे. सोमवारी दुपारी घोलप व भागानगरे यांनी कोतवाली पोलिसात गणेश हुच्चे याच्या अवैध व्यवसायांची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गणेश हुच्चे याच्या अवैध व्यवसायावर कारवाई केली. यावरून गणेश हुच्चे व घोलप, भागानगरे यांच्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात वाद होऊन, ‘तुम्ही चांगले केले नाही, मी तुमच्याकडे पाहुन घेतो’, अशी धमकी हूच्चे याने दिली होती.
त्यानंतर रात्री घोलप व भागानगरे हे मित्र प्रणव दाणे व यश याचा वाढदिवस असल्याने शुभम पडोळे, अदित्य खरमाळे या मित्रांबरोबर जाधव मळा येथे गेले. तेथेच एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हुच्चे, बोराटे व गुडा यांनी तिघांवर हल्ला केला. ओंकार घोलप हा अंधारात पळून जाऊन लपून बसल्याने वाचला. तर ओंकार भागानगरे व शुभम पडोळे या दोघांवर तलवारीने वार करण्यात आले. यात भागानगरे हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मयत झाला. तर पडोळेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. मयत भागानगरे याच्या मृतदेहाचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.