मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आणि अखेर 16 जून रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला देखील आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करत असून, कमाईच्या बाबतीत देखील चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.
दरम्यान, आदिपुरुषच्या या यशात मराठमोळ्या कलारांचा देखील मोठा वाटा असल्याचं समोर आलं आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मराठी अभिनेता ‘देवदत्त नागे’ हनुमानाच्या भूमिकेत दिसून आला आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सध्या सगळीकडेच कौतुक होताना दिसत आहे.
तर, दुसरीकडे ‘आदिपुरुष’मध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शुर्पणखाची भूमिका साकारली आहे. तेजस्विनीने गेल्या काही दिवसांपूर्वी ती ‘आदिपुरुष’ सिनेमात झळकणार असल्याचं जाहीर केलं होतं.
पण ती नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याबद्दल तिने खुलासा केला नव्हता. पण ‘आदिपुरुष’ चित्रपटात शुर्पणखाच्या भूमिकेत तेजस्विनीला पाहूण मराठी प्रेक्षकांना खूपच चांगलं सरप्राईज मिळालं आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.