नगर जिल्ह्यातील छापेमारी भोवली; अपर पोलीस अधीक्षक राठोड यांची उचलबांगडी

नगर (प्रतिनिधी) – नगरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची बुधवारी रात्री तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी आता चोपडा (जळगाव) येथून सौरभकुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. राठोड यांनी एक महिन्यापूर्वीच नगर जिल्ह्यात अपर अधीक्षकपदाचा पदभार घेतला होता. मात्र, अवघ्या वीस दिवसांत त्यांची बदली झाल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, राठोड यांचे बदली आदेश झाल्यानंतर आज (गुरुवारी)सकाळी त्यांची व नेवासे पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलसोबत राठोड यांचे संभाषण झाल्याची ऑडिओ क्‍लीप व्हायरल झाली आहे. राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्‍लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्‍लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का, अशी विचारणा करत असून, एका बाईंनी जिल्ह्यात फार पैसे कमावले आहेत का, असा प्रश्‍नही कॉन्स्टेबलला विचारत आहेत.

दरम्यान, या क्‍लीपमधील आवाज राठोड यांचाच आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना राठोड यांनी हा आवाज आपला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही क्‍लीप खरी का खोटी? यावर मतभिन्नता आहे. नेवासे पोलीस ठाण्यातील कथित गर्जे नावाचे पोलीस कर्मचारी राठोड यांच्याशी फोनवरून चर्चा करत आहेत. चर्चेमध्ये राठोड यांना भेटायला यायचे असल्याचे ते पोलीस कर्मचारी सांगत आहेत.

“सगळे काही गोळा करून ठेवले आहे. कारवाई करायची गरज नाही. तुम्ही फक्त आदेश द्या. आपल्याकडे खूप मोठे बाऊन्सर आहेत. फक्त आपण सांगायचा उशिर आहे. आपला शब्द ते खाली पडू देणार नाहीत. आम्ही व आमचे डेरे साहेब तुम्हाला भेटायला येतो. आल्यानंतर सविस्तर चर्चा करू,’ असा युक्तिवाद गर्जे करत आहेत. त्यावर तू सांगितले म्हणजे होईल का? त्यासाठी रेड टाकायला तिकडे यावे लागेल का? असा प्रश्‍न राठोड यांनी गर्जे यांना केला. त्यावर गर्जे म्हणतात, रेड टाकण्याची आवश्‍यकता नाही. सगळे काही तयार करून ठेवले आहे. उत्तरेत चांगले मार्केट आहे. माझी बदली तिकडेच व्हायला हवी होती, असे राठोड यांनी सांगताच, गर्जे म्हणाले, साहेब तुम्ही तिकडे राहिले काय किंवा इकडे, काय फरक पडतो? आम्ही तुम्हाला भेटायला येतोच. त्यावर राठोड म्हणतात, या नुसताच येतो की माल घेऊन येतो. नेवासे तालुक्‍यातील मोठ्या बियाणे उद्योजकाच्या नावाचाही या क्‍लीपमध्ये समावेश आहे. हा उद्योजक पोलिसांचा शब्द खाली पडू देत नाही, असे हा कॉन्स्टेबल सांगत आहे.

राठोड यांच्या पथकातील अधिकारी-कर्मचारी निलंबित
अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकातील सात कर्मचारी व एका अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. मात्र निलंबनाचे कारण विचारले असता त्यांनी याबाबत मौन साधले. नुकतीच राठोड यांची तडकाफडकी बदली झाली. त्याच पाठोपाठ या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

…तर पोलिसांचा “खा’की चेहरा स्पष्ट होईल..!
पोलीस कर्मचारी गर्जे व अपर अधीक्षक राठोड यांच्या “त्या’ कथित ऑडिओ क्‍लीपवरुन पोलीस दलातच अस्वस्थता पसरली आहे. ती क्‍लीप खरी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास पोलिसांचा “खा..की’ चेहरा उघड होईल, अशी भीती पोलिसांना आहे. त्यात हप्तेखोरी कशी आहे? याचाच भांडाभोड झाल्याने या क्‍लीपची सत्यता वरिष्ठ पातळीवरुन पडताळून पाहायला हवी, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.