त्या’ मतदान केंद्रांवर “सूक्ष्म’ नजर

शहरातील 37, मावळात 16 मतदान केंद्र संवेदनशील, तर दोन केंद्र उपद्रवी

पिंपरी – विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार मतदारसंघात मतदान शांततेत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोग, पोलीस व प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील 36 मतदान केंद्र संवेदनशील ठरविली आहेत. तर मावळात 16 मतदान केंद्र संवदेनशील तर 2 मतदान केंद्र उपद्रवी ठरवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्‍त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे, अशा मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नजर राहणार आहे. लोकसभा निवडणुका प्रमाणेच विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

एखाद्या मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान होणे. एकाच उमदेवाराला 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान मिळणे. सिंगल वोटर्सची संख्या अधिक असणे किंवा मतदान केंद्राला असलेला हिंसाचाराचा इतिहास, अशी मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात येतात. पुणे जिल्ह्यात अशी एकूण 249 मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर 3 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील ठरवण्यात आली आहेत.

पिपंरी-चिंचवड शहराचा विचार केला. पिंपरी-चिंचवड शहरातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 37 मतदार संघ संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्र ठरवण्याबाबत निवडणूक विभाग, पोलीस प्रशासनाची गेल्या आठ दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. आता हे मतदान केद्र निश्‍चित झाले आहे.
या केंद्रांवर पोलिसांचा, केंद्रीय सुरक्षा दलाचा अतिरिक्त फौजफाटा तैनात राहणार आहे. या शिवाय प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येणार आहे. या निरीक्षकाच्या माध्यमातून या मतदान केंद्रांचा संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्र – पिंपरी-चिंचवड शहरामधील तीन विधानसभा मतदान केंद्रापैकी पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक 19 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर चिंचवडमध्ये 12 व भोसरी मतदारसंघात सर्वात कमी 6 मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. याबरोबरच शहरालगतच्या मावळ मतदार संघामध्ये 16 मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली आहे.

मावळात दोन मतदान केंद्र असुरक्षित – संवदेनशील मतदान केंद्रांबरोबरच जिल्ह्यातील असुरक्षित मतदान केंद्रेही चिन्हित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 3 मतदान केंद्रे असुरक्षित असून त्यापैकी सर्वाधिक दोन असुरक्षित मतदान केंद्रे ही मावळ मतदार संघामध्ये आहेत. तर शिरुर विधानसभा मतदारसंघामध्ये एक मतदान केंद्र असुरक्षित आहे.

सूक्ष्म निरीक्षकांचा अहवाल थेट आयोगाकडे – संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रावर सर्व ठिकाणी सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सूक्ष्म निरीक्षकांना मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यापासून ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तेथील अहवाल थेट निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागणार आहे. तसेच मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्रॉंगरुममध्ये सील होईपर्यत या सुक्ष्म निरीक्षकांची नजर असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.