मतदान करणे हे आपले पहिले कर्तव्य; सेलिब्रिटींचे आवाहन

मतदानाचा हक्‍क बजावा : दैनिक “प्रभात’शी संवाद


मतदानाचा टक्‍का वाढणे हे सदृढ लोकशाहीसाठी आवश्‍यक

– दीपेश सुराणा

पिंपरी – मतदान करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. मतदानाच्या माध्यमातून आपल्याला एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मिळते. त्यामुळे ही संधी न दवडता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्‍यक आहे, असे मत सेलिब्रिटींनी मंगळवारी “दै. प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केले.

विधानसभेची निवडणूक 21 तारखेला आहे. मतदानाचा टक्का वाढणे हे सदृढ लोकशाहीसाठी आवश्‍यक आहे. त्याला अनुसरून सेलिब्रिटींशी संवाद साधला असता त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री) : मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून घरी “रिलॅक्‍स’ बसण्यापेक्षा आपण मतदानाचा हक्‍क बजावणे आवश्‍यक आहे. आपण इतरांना दोष देण्याआधी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. उमेदवारांची पार्श्‍वभूमी, त्याने केलेले काम तपासूनच मतदान करायला हवे. आपण मतदान हे आपल्या स्वत:साठी करीत असतो, याचे भान ठेवायला हवे. “हिरकणी’ या माझ्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनचे काम थांबवून मी स्वत: 21 तारखेला मतदान करणार आहे.


डॉ. प्रियांका यादव (अभिनेत्री) : आपण निवडणुकीसाठी मतदान करून चांगले नेते निवडू शकतो. जर आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर आपण चांगले नेते निवडणे गरजेचे आहे. जो उमेदवार लोकांची कामे करेल त्यालाच आपण निवडायला हवे. मतदान करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून आपण मतदान करायला हवे.


 

आशा नेगी-हिरेमठ (मॉडेल व अभिनेत्री) : आपण मतदान करून एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून देणे आवश्‍यक आहे. आपण जर चांगला लोकप्रतिनिधी निवडला नाही, तर आपल्या समस्यांची सोडवूणक कशी करणार? आपण चुकीची व्यक्ती, तर निवडून देत नाही ना, याबाबतही नीट विचार करायला हवा. मतदानाच्या दिवशी असलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यापेक्षा मतदानासाठी घराबाहेर
पडायला हवे.


स्मिता तांबे (अभिनेत्री) : विधानसभा निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उमेदवार निवडताना त्याचा जनसंपर्क किती आहे, जनतेच्या प्रश्‍नांची त्याला किती जाण आहे, संबंधित उमेदवाराचा पक्ष जनतेशी किती “कनेक्‍टेड’ आहे, याचा विचार आपण करायला हवा. दिल्लीप्रमाणे गल्लीतल्या देखील समस्या मिटणे आवश्‍यक आहे. त्यासाठी योग्य उमेदवार निवडून मतदान करायला हवे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)