फलटणमध्ये खासदार गटात फूट पडण्याची शक्‍यता  

फलटण  – फलटण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच खासदार गटांतर्गत असणारी गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत खासदार गटाला मोठा दणका देत नगरसेवकांसह काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

फलटण मतदारसंघातील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहचली असून महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांनी मतदारसंघ ढवळून काढल्याने चुरस निर्माण झाली आहे. परंतु, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तरीही त्यांच्याभोवती वावरणारी काही मंडळी जनता व कार्यकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचारात दंग आहेत.

देशपातळीसह राज्यपातळीवरही हुकमी एक्‍क्‍याप्रमाणे अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भाजपबाबत फलटण शहर व तालुक्‍यात मात्र अनेक गावांतून नाराजीचा सूर आळवला जात आहे. गावात खासदार आल्यावर काही जण प्रत्येक कामात श्रेय घेत आहेत, श्रेय घेताना प्रामाणिकपणे व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासदारांपर्यंत पोहचू न देण्याचेही कामही ते बजावत असल्याचीही चर्चा खासदार गटात जोरदारपणे सुरु आहे.

याच परिस्थितीला वैतागून व खासदार कसलीही दखल घेत नसल्याने शहरातील काही विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी खासदार गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आगवणे यांच्या उमेदवारीबाबत टोकाची भूमिका घेऊ, असे बोलून त्यांना विरोध करणारे काही जण मुख्यमंत्र्यांच्या सभेत स्टेजवर दिमाखदारपणे वावरत होते. तर प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र पोलीस स्टेजच्या आसपासही फिरकू देत नव्हते. या प्रकाराने अनेक जण दुखावले गेले.

ज्यांचा विरोध होता तेच आता निवडणुकीत “बिनीचे शिलेदार’ होऊन वावरत असल्याने ज्या कार्यकर्त्यांनी रणजितसिंह यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, ते आज बाजूला पडले असल्याचे चित्र आहे. आजवर अनेकांनी खासदारांकडे पाहून मनाला आवर घातला. परंतु, त्यांच्या दृष्टीतही हे कार्यकर्ते दखलपात्र नसल्याची खंत कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणात करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी आपल्या रागास व भावनांना वाट मोकळी करुन देत सोशल मीडियावर खासदारांसमोर पुढे पुढे करत चमकोगिरी करणाऱ्या व “काम कमी अन्‌ व्याप जादा’ अशी अवस्था असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना शेलक्‍या शब्दात फटकारले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)