सातारा -करोनाचे मोठे संकट उभे असताना नागरिक, बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उद्धट भाषा वापरण्याचे प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात होत आहेत. ही बाब गंभीर असून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी पदाधिकारी, नागरिकांशी उद्धट बोलू नये, याबाबत तक्रारी आल्यास गय केली जाणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी डॉ. सोनवणे यांची झाडाझडती घेत खडे बोल सुनावले.
कबुले यांच्या सूचनेनुसार मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात करोना आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्ह्यातील करोना परिस्थिती आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती डॉ.सुभाष चव्हाण व डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
जिल्ह्यातील बाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्युदर ही चिंतेची बाब असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना कबुले यांनी केल्या. करोना संकटात अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्णांना म्बुलन्स, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर मिळत नाही. अशी परिस्थिती असताना कोणी काही मुद्दाम आपल्याकडे मदत मागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली वर्तणूक चांगली ठेवणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयात विविध कारणास्तव येणारे रुग्ण, करोनाबाधित रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट बोलण्याचे प्रकार होत आहेत. रुग्णांना सेवा मिळण्याऐवजीज त्यांना हीन दर्जाची वागणूक मिळत आह्े, ही बाब गंभीर आहे. डॉ. सुनील सोनवणे यांच्याबद्दल अनेक पदाधिकारी व नागरिकांच्या तक्रारी असून त्यांनी कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे. नागरिक, पदाधिकाऱ्यांशी उद्धट बोलल्यास परिणामांना सामोरे जा, असा इशारा कबुले यांनी बैठकीत दिला.
जिल्हा रुग्णालयाबाबत अनेक पदाधिकारी,नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनावणे यांच्या कारभाराबाबत असणाऱ्या तक्रारींची माहिती घेण्यात आली. डॉ. सोनवणे यांना कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाच्या संकटात उद्धट वर्तन करून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणाचीही करणार नाही.
उदय कबुले
अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा