-->

प्रवेश रद्द झाल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार

विद्यापीठ अनुदान आयोगाचे महाविद्यालयांना आदेश 

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास त्यांच्याकडून शुल्कात कोणत्याही प्रकारची कपात न करता संपूर्ण शुल्क परत करण्यात यावे, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. 

“यूजीसी’ने नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानुसार राज्यात नोव्हेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाचे वर्ष सुरू होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची शुल्काची कपात करू नये, असेही त्यात नमूद केले आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी मुख्यत: पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे काही विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रद्द करून दुसरीकडे प्रवेश घेण्याची शक्‍यता आहे. प्रवेश रद्द केल्यानंतर भरलेले शुल्क संस्थांकडून परत मिळणे शक्‍य नसते. त्यात पालकांची आर्थिक परवड होऊ नये, यासाठी यूजीसीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात कपात करू नये. त्यांना संपूर्ण शुल्क परत करण्यात यावेत. तसेच त्यानंतरही डिसेंबरअखेपर्यंत एक हजार रुपयांपर्यंत प्रक्रिया शुल्क कमी करून बाकी सर्व शुल्क परत करण्यात यावे असेही युजीसीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.