भोर -भोर तालुक्यात आणखी 9 करोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यातील बाधितांची संख्या 64 वर पोहोचली आहे. यातील 25 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 39 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे आणि गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली आहे.
तालुका आरोग्य विभागाने तीन दिवासांपूर्वी 49 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्यापैकी आज (दि. 9) 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात भोर शहर – 2, शिंदेवाडी – 6, व वेळू – 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
शिंदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले होते, त्यांचे संसर्गात आलेल्या 6 लोकांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून, वेळू येथे आज आढळलेला बाधित रुग्ण हा येथीलच एका कंपनीत कामाला असून, तो पुण्याचा असला तरी वेळू येथे खोली घेऊन राहत होता. भोर नगरपालिकेतील 26 जणांचे स्वॅब तपासाणीसाठी पाठवाले होते, त्यातील दोन जणांचे आहवाल पॉझिटिव्ह आले असावेत असे डॉ. कऱ्हाळे यांनी सांगितले.
भोरचे मुख्याधिकारी सोमवार (दि. 6) बाधित आढळल्याने त्यांच्या संसर्गात आलेल्या 26 जणांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या संसर्गात आलेल्या नगरसेवकांना सरकारने क्वारंटाईन करावे, अशी ही मागणी होत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सरकारने निर्धारीत केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले आहे.