पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येसह मयतांच्या संख्येत पुन्हा मोठी भर पडली आहे. आज दिवसभरात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला असून 587 जणांना लागण झाली आहे. मयतांमध्ये शहरातील 9 तर शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. तर बाधितांमध्ये शहरातील 568 तर शहराबाहेरील 19 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6061 इतकी झाली असून एकूण मयतांचा आकडा 122 वर पोहोचला आहे.
बुधवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 568 जणांना तर शहराबाहेरील 19 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील 9 जणांचा तर बाहेरील दोघांचा समावेश आहे. शहरातील मयतांमध्ये सहा पुरुषांचा तर तीन महिलांचा समावेश असून ते विठ्ठलवाडी, आकुर्डी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, गांधीनगर येथील रहिवासी होते.
शहराबाहेरील मयतांमध्ये पुणे येथील एका महिलेचा आणि इंदोरी येथील एका पुरुषाचा समावेश आहे. 38 ते 70 वयोगटातील हे सर्व मयत आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
आतापर्यंत शहरातील 3681 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 262 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 31339 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 22900 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.