पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 22) 8 करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. औंध, येरवडा, पुणे शहर आणि खेड तालुक्यातील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.
करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये येरवडा-रामनगर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. त्याशिवाय, येरवडा-रामनगर येथील 25 वर्षीय तरुणाला देखील करोनाची लागण झाली. औंध, पुणे शहर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि खेड तालुक्यातील 25 वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे.
करोनाबाधितांमध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात आज नव्याने 18 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयात सध्या 28 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 9 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, करोनामुक्त झालेल्या 65 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.