पुण्यातून घेतला ताब्यात; सुत्रधाराचा शोध सुरू
सातारा (प्रतिनिधी) : विनंती बदलीसाठी पोलिसांना आॅनालाइन गंडा घालणार्या भामट्याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पृथ्वीराज पवार असे त्याचे नाव असून यातील खर्या सुत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत. थेट पोलीस ठाण्यात फोन करून बदलीसाठी इच्छुकांची यादी मागवून त्यांना पैसे मागण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने. कर्मचाऱ्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे संबंधित भामट्याला तातडीने अटक करून एलसीबीच्या पथकाने त्याला सातार्यात आणला आहे.
यंदा करोनामुळे राज्य शासनाकडून बदल्या न करण्याबाबतचा आदेश निघाला अन् अनेकांच्या चेहर्यावर नाराजी दिसून आली. नेमका याचाच फायदा घेत, या सगळ्या गोष्टींची माहिती असलेल्या भामट्यांनी पोलीसांना बदल्यांचे गाजर दाखवून खिसा गरम करण्याचा बेत आखला होता. दि. 17 जून रोजी सकाळी वाई पोलीस ठाण्याचा फोन खणाणला तो फोन एका सहाय्यक फौजदार असलेल्या अधिकार्याने उचलला होता. त्यावेळी समोरून बोलणार्या व्यक्तीने तुमच्याकडील विनंती बदलीसाठी इच्छूक लोकांची यादी कोणाकडून मिळेल असे विचारले विचारल्याने त्या सहाय्यक फौजदाराने आपण कोण बोलत आहात असे विचाल्यावर त्याने मी पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगितले.
त्यामुळे त्याला वाई पोलीस ठाण्याच्या हजेरी मेजरचा मोबाइल नंबर देण्यात आला. त्यानंतर त्या व्यक्तीने हजेरी मेजरला फोन करून पून्हा तीच माहिती विचारून फोन ठेवला. हजेरी मेजरला शंका आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना घटना सांगितल्याने खोबरे यांनी संबंधिताला त्याच्या मोबाइलवर फोन करून त्याचे पद व नेमणूक याबाबत विचारणा केली.
तेव्हा आपलं पितळ उघडं पडण्याच्या भितीने संबंधिताने मी पुण्याला असतो असे सांगून फोन ठेवून दिला होता. याप्रकरणी वाईचे हजेरी मेजर असलेले सुनिल वाघमळे यांनी वाई पोलीस ठाण्यात संबंधित भामट्याविरोधात फिर्याद दिली होती. तर दुसरा प्रकारही असाच पाचगणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अरविंद माने व पोलीस नाईक जगताप यांच्यासोबत घडला आहे. त्यांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना शाखेतून पाटील बोलत असल्याचे सांगून संबंधिताने माने यांना सात व जगताप यांना पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात असला प्रकार पहिल्यांदाच झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संबंधितांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी पृथ्वीराज पवार या भामट्याला पुण्यातून ताब्यात घेतला आहे. तर यातील मुख्य संशयित अजून पसार आहे.