नवी दिल्ली – खासदारकी धोक्यात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत भर पडली आहे. आता त्या सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून महुआ राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या प्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकपालांकडे तक्रार दाखल केली.
आता लोकपालांच्या शिफारसीवरून सीबीआयने महुआ यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आर्थिक लाभासाठी महुआ यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोपही दुबे यांनी केला आहे. मात्र, वादाच्या केंद्रस्थानी आल्यापासून महुआ कुठले गैरकृत्य केल्याचा इन्कार करत आहेत. तृणमूल हा त्यांचा पक्षही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे.